१४ टक्के मुसलमानांसाठी पाकिस्तान दिला, तर काश्मिरी हिंदूंसाठी पनून कश्मीर का नाही ? – राहुल कौल

इंदूर (मध्यप्रदेश) येथे भारत स्वाभिमान मंचच्या वर्धापनदिनानिमित्त एक भारत अभियानाची सभा !

इंदूर (मध्यप्रदेश), ११ एप्रिल (वार्ता.) – जर १४ टक्के मुसलमानांसाठी भारताचे तुकडे करून पाकिस्तान दिला जाऊ शकतो, तर काश्मिरी हिंदूंना त्यांच्या अधिकाराचे पनून कश्मीर का मिळू शकत नाही ? आम्ही काश्मीरमध्ये भारताच्या संविधानाप्रमाणे, त्याच्याशी एकनिष्ठ अशा प्रदेशाची मागणी करत आहोत. भाजपसारख्या हिंदुत्वनिष्ठ शासनाने ही मागणी त्वरित मान्य करायला हवी. देशभरातील हिंदू याला पाठिंबा देतील. काश्मीरमधील बहुसंख्य मुसलमानांपुढे शासन लोटांगण का घालत आहे ?, असा प्रश्‍न युथ फॉर पनून कश्मीरचे अध्यक्ष श्री. राहुल कौल यांनी उपस्थित केला. ते येथील मराठी समाज भवनामध्ये भारत स्वाभिमान मंचच्या प्रथम वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित केलेले अधिवेशन आणि एक भारत अभियानच्या जाहीर सभेत बोलत होते.

डावीकडून श्री. योगेश व्हनमारे (१), श्री. आनंद जाखोटिया (३)

काश्मीरच्या स्थितीतून बोध घेऊन हिंदूंनी आता तरी जागे व्हावे ! – कर्नल (निवृत्त) मनोज बर्मन

पूर्वी अफगणिस्तानपासून कंबोडियापर्यंत हिंदूंचे राज्य होते. हळूहळू अखंड भारताचा एकेक प्रांत आक्रमकांनी बळकावला; पण हिंदू निद्रिस्त राहिले. काश्मीरसारखी स्थिती पूर्ण भारतात निर्माण होत आहे. आता तरी आम्ही जागे होणार का ? उरलेल्या भारताला वाचवण्यासाठी हिंदूंनी काश्मीरच्या स्थितीतून बोध घ्यायला हवा.

देशाच्या विरोधकांना धडा शिकवण्यासाठी ५ लक्ष युवकांचे संघटन करणार ! – राजदीप सिंह, भारत स्वाभिमान मंच

भारत स्वाभिमान मंच येत्या ५ वर्षांत प्रेम आणि त्यागाची भावना असणार्‍या ५ लाख युवकांना मध्यप्रदेशात सिद्ध करेल. देशभरात जेथे कोठे देशविरोधी कारवाया होतील, तेथे आम्ही धडक मारू.

काश्मीरमध्ये जिहाद्यांनी केलेल्या प्रयोगाची आज संपूर्ण भारतात पुनरावृत्ती ! – राहुल राजदान

काश्मीरमध्ये जो हिंदूंचा वंशविच्छेद झाला, तो आम्ही अनुभवला आहे. त्यामुळे त्याविषयी चर्चा झाली की, हृदय पिळवटून निघाल्याशिवाय रहात नाही. जे आम्ही भोगले, ते देशातील अन्य हिंदूंना भोगायला लागू नये, यासाठी ही सभा आहे. काश्मीर हा आतंकवाद्यांनी हिंदूंवर केलेला प्रयोग होता. आज त्याची संपूर्ण भारतात पुनरावृत्ती होत आहे.

धर्मसंस्थापनेच्या कार्यात हिंदूंनी साधना म्हणून सहभागी व्हावे ! – योगेश व्हनमारे, मध्यप्रदेश समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

आज बहुसंख्य हिंदूंना हिंदु शब्दाची व्याख्याही ठाऊक नाही. त्यामुळे धर्माचे आचरण करणे लांबच आहे. याउलट धर्मयुद्धाच्या नावाखाली उपासनेच्या बळावर मूठभर जिहाद्यांनी संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. हे धर्मअधर्माचे युद्ध आहे, हे हिंदूंनी लक्षात घेऊन परमेश्‍वराची उपासना करायला हवी. तपश्‍चर्या असेल, तरच या युद्धात निभाव लागणार आहे. भगवंताने अधर्म वाढल्यावर प्रत्येक वेळी अवतार घेऊन धर्मसंस्थापना केली आहे. धर्मसंस्थापनेच्या कार्यात हिंदूंनी साधना म्हणून सहभागी व्हायला पाहिजे.

सिंहासारखे बलशाली बनल्यावर भारत हिंदु राष्ट्र बनण्यास वेळ लागणार नाही ! – श्री. आनंद जाखोटिया, सनातन संस्था

हिंदूंची अवस्था मेंढरासारखी झाली आहे. आपल्याला सिंह बनायला हवे; कारण दुर्गामाता सिंहावर आरूढ होते. आपण सिंहासारखे बलशाली बनल्यावर भारत हिंदु राष्ट्र बनण्यास वेळ लागणार नाही.

क्षणचित्र : केवळ २ कार्यकर्त्यांपासून चालू झालेल्या भारत स्वाभिमान मंचने गेल्या एक वर्षात घेतलेल्या गरूडभरारीचे श्री. अमित शर्मा यांनी प्रोजेक्टरवर छायाचित्रांच्या माध्यमातून  सादरीकरण केले.

एक भारत अभियान काय आहे ?

या वेळी एक भारत अभियानाची माहिती देतांना श्री. राहुल कौल म्हणाले, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था आयोजित अखिल भारतीय हिंदू अधिवेशनामध्ये जून २०१६ मध्ये सर्व संघटनांनी मिळून काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी एक भारत अभियानच्या माध्यमातून लढा देण्याचे निश्‍चित केले. त्यानंतर आजपर्यंत या अभियानाच्या अंतर्गत भारतातील विविध राज्यांत सभा, बैठका, ठराव यांच्या माध्यमातून हा विषय शासनासह हिंदु समाजापर्यंतही पोेहोचत आहे.

Source-http://sanatanprabhat.org/marathi/40406.html


Disclaimer: The facts and opinions expressed within this article are based on its Source and Reference. www.HinduAbhiyan.com does not assume any responsibility or liability for the accuracy, completeness, suitability, or validity of any information in this article, and agree or disagrees with it in national interest only.

Share

Compare